Monday, 23 March 2015

लोकन्यायालय देते साद ... सलोख्याने सोडवा वाद……



लोकन्यायालय देते साद ... सलोख्याने सोडवा वाद……
          कोणत्‍याही देशाच्‍या विकासात न्‍यायपालीकेचे योगदान अत्‍यंत महत्‍वाचे असते. स्‍वातंत्रयानंतरच्‍या कालावधीत भारतीय न्‍यायव्‍यवस्‍थेने राष्‍ट्रासमोरील आव्‍हाने समर्थपणे पेलली आहेत.  भारतीय न्‍यायव्‍यवस्‍था जगातील आदर्श न्‍यायव्‍यवस्‍थेपैकी एक समजली जाते. भारतातील वेगवेगळया स्‍थरावरील विषमता, निरक्षरता, प्रचंड लोकसंख्‍या अशा विविध समस्यांमधून वाट काढत आज भारतीय न्‍यायव्‍यवस्‍था पुर्णपणे विकसीत झाल्‍याचे दिसून येते.
          रेंगाळलेल्‍या खटल्‍यांची संख्‍या पाहून न्‍यायव्‍यवस्‍थेच्‍या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्‍ह लावले जाते. मात्र खटले रेंगाळण्‍याची अनेक कारणे आहेत. अनेक खटले अत्‍यंत किरकोळ घटना व परिस्‍थीतीत निर्माण झालेले असतात. सामान्‍य नागरीकांचे कायदयाचे अज्ञान, न्‍यायालयांची व वकीलांची गरजेपेक्षा कमी असलेली संख्‍या, दारीद्रय, देशाची भौगोलीक रचना, दळणावळणाच्‍या साधनांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे खटल्‍यांची संख्‍या वाढलीही आणी हे खटले रेंगाळलेत सुध्‍दा..........  मात्र गेल्‍या दशकापासून भारतीय न्‍यायव्‍यवस्‍थेमध्‍ये अत्‍यंत वेगाने बदल होत असून न्‍यायालयीन कामकाजामध्‍ये संगणक, व्‍हीडीओ कॉन्‍फरंसींग, इंटरनेट आदी सुवीधांचा वापर तथा सर्व न्‍यायालयांची व प्रलंबित खटल्‍यांची माहिती सहजतेने उपलब्‍ध होण्‍याकरीता करण्‍यात आलेली संगणकीय व्‍यवस्‍था आदी बाबींमुळे न्‍यायालयीन कामकाजाचा वेग वाढला आहे. देशातील सर्वोच्‍च व उच्‍च न्‍यायालयांचे न्‍यायनिर्णयातून स्‍थापीत झालेली तत्‍वे जनतेकरीता आंतरजालावर उपलब्‍ध होत असल्‍याने जनता कायदयाबाबत साक्षर होत आहे.
          वर नमुद केल्‍या प्रमाणे भौतीक बदल तर होतच आहेत, मात्र त्‍यासोबतच नागरीकांवर संस्‍कार करण्‍याची जबाबदारी सुध्‍दा शासन व न्‍यायपालीकेने उचलली आहे. त्‍यामुळे समाजात सकारात्‍मक प्रगतीचा शंखनाद झाला असून त्‍याचा परिणाम लवकरच दिसू लागेल. किरकोळ वाद न्‍यायालयात गेल्‍यानंतर ते सतत प्रलंबित राहील्‍याने हे वाद विकोपाला जातात व मग त्‍यातून गंभीर घटना जन्‍म घेतात. त्‍यामुळे वादांचा निर्णय करण्‍यापुर्वी वादी प्रतिवादींचे, आरोपी फिर्यादींची मनोमिलन व सकारात्‍मक पध्‍दतीने वादांचे निरसन कसे करता येईल, ही चिंता देशातील न्‍यायविदांना लागली होती. निरंतर विचार मंथनातून लोक न्‍यायालय ही वाद निरसन व्‍यवस्‍था जन्‍माला आली आहे. महाराष्‍ट्रातील राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांच्‍या ग्रामगीता हया ग्रंथात हया लोकन्‍यायालयाच्‍या संकल्‍पनेची आवश्‍यकता महारांजांनी वर्णली आहे. लोकन्‍यायालयाची ही चळवळ अधिकाधिक लोकाभिमुख व्‍हावी, हया करीता हा लेखन प्रपंच........  
वंदनिय राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज म्‍हणतातः-   
कायदाची नव्‍हे सर्व काहीप्रचारा ऐसे श्रेष्‍ठ नाही ׀
सर्वांसी मानवतेचे पाठ देईतो नियमन करी न करिता ׀׀
परि दंडे अन्‍याय जरि नाशते, लोक जरि सुधारले असते׀
 तरि तुरूंग हे न वाढतेगुन्‍हे न होते अधिकाधिक ׀׀
          समाजव्‍यवस्‍थेच्‍या नियमनासाठी कायदे व नियम आवश्‍यक असले तरी कायदयांमुळेच समाजाची घडी सावरता येईल असे नाही.  केवळ कायदयांच्‍या भितीने जनता निट वागेल असे नाही, कायदे कितीही तरी त्‍यातील पळवाटा शोधणे हा मानवी स्‍वभाव आहेम्‍हणून सामान्‍य नागरिक सुजाण झाला पाहिजे त्‍याची वर्तणुकच मानवी गुणांची व संस्‍कारी असली पाहीजे, याकडे लक्ष दिल्‍या गेले पाहिजे. त्‍याकरीता व्‍यक्‍तीच्‍या अंतःकरणावर संस्‍कार झाले पाहीजेत, ही बाब स्‍पष्‍ट करतांना वं. महाराज म्‍हणतात ..... 
हेचि जाणोनि सज्‍जन म्‍हणतीजागवा हृदयातील अंर्तज्‍योति ׀
तरीच सुधारेल मानववृत्तिजग होईल आदर्श׀׀
          हया मानवीवृत्‍तीला आवाहन करण्‍याकरीता शासन व न्‍यायपालीकेने लोकन्‍यायालयाची सुंदर व्‍यवस्‍था निर्माण केली आहे.  लोकन्‍यायालय अत्‍यंत यशस्‍वी होत असल्‍याने, अत्‍यंत उत्‍साहाने ही संकल्‍पना राबविण्‍यात येत आहे.  येत्‍या 11 एप्रिल 2015 रोजी महाराष्‍ट्रातील उच्‍च न्‍यायालये व खंडपीठे, सर्व जिल्‍हा न्‍यायालये, तालुका न्‍यायालये, कौटूंबिक न्‍यायालये इतर सर्व न्‍यायालंयामध्‍ये राष्‍ट्रीय विधी सेवा प्राधिकारणाच्‍या आदेशाने राष्‍ट्रीय लोक अदालत आयोजित करण्‍यात येत आहे.
          लोकन्‍यायालयाअंतर्गत न्‍याय प्र‍विष्‍ठ प्रकरणे सामंजस्‍याने मिटविण्‍याकरीता न्‍यायाधिश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ पॅनल पक्षकारांना मदत करते व न्‍यायनिर्णयापेक्षा मनोमिलन व सामंजस्‍याचा मार्ग या ठिकाणी अवलंबन्‍यात येत असल्‍याने पक्षकारांमध्‍ये जय- पराजय, जिंकणे - हरणे यातून निर्माण होणारी कटूता मुळापासून नष्‍ट होते. त्‍याउलट परस्‍पर प्रेम व विश्‍वासाचे वातावरण निर्माण होते. सोबतच पक्षकारांचा पैसा वेळ सुध्‍दा वाचतो, त्‍यामुळे नागरिकांकडूनही या संकल्‍पनेला मोठया प्रमाणात समर्थन मिळत असून आतापर्यंत महाराष्‍ट्रात 19 लाखांपेक्षा अनेक प्रकरणे लोक अदालतीच्‍या माध्‍यमातून निकाली काढण्‍यात आली आहेत.    
लोकन्‍यायालयाच्‍या कामकाजाची पध्‍दतीः-  लोकन्‍यायालयाची पध्‍दतीची नाळ वं. राष्‍ट्रसंतांच्‍या विचारधारेशी जुळलेली असून त्‍याची बिजे ग्रामगीतेत दिसून येतात.
नको वैदय अथवा डॉक्‍टर,  आपणचि राहे आरोग्‍यतत्‍पर׀
नको वकील, न्‍यायाधिश, दंडधर,  न्‍यायव्‍यवहार सहजची ׀׀
  ऐका याचे समाधान, करावी एक समिति निर्माण׀׀
  सर्वांनी आपुले प्रतिनिधी म्‍हणून, नेमावे काही कारभारी ׀ ׀
नसता कोणाचेहि शासन, न्‍यायाने वागती सत्‍ययुगी जन ׀
              त्‍याचेचि‍ रूपांतर पंचायतन लोकशाही लोकतंत्र ׀ ׀
          या विचाराप्रमाणेच वादी व प्रतिवादींच्‍या आपसी समझोत्‍याने किंवा समितीच्‍या निर्णयाने वादाचा सोक्षमोक्ष लावला जातो. वादी व प्रतिवादींना आपसात समझोता करण्‍याकरीता मार्गदर्शन करणे, नेमकी चुकीची भूमीका कोणाची आहे, हे समजावून सांगून विकल्‍पाला प्रेरीत करण्‍याचे कार्य सुध्‍दा लोकन्‍यायालयात केले जाते. त्‍यामुळे परस्‍परातील वाद कायमचा संपतो व सलोखा निर्माण होतो, ही बाब निकोप समाजनिर्मीती करीता आवश्‍यक आहे. लोकन्‍यायालयाच्‍या न्‍यायमंडळावर न्‍यायाधिश, सामाजसेवक, शिक्षक, वकील असे अनेक विद्रवान मंडळी असल्‍या तरी लोकन्‍यायालयात कोणताही खर्च येत नाही. या सर्वांचे मार्गदर्शन मोफत मिळते. लोक न्‍यायालयातील निर्णयांच्‍या प्रती मोफत मिळतात आणी हा त्‍या वादाचा अंतीम व कायमचा निर्णय असतो , त्‍यानंतर कोणतेही अपील होत नाही.
          न्‍यायालयांमध्‍ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणांसोबतच कोणताही वाद न्‍यायप्रविष्‍ठ होण्‍यापुर्वी सुध्‍दा तो वाद लोकन्‍यायालयात सोडविता येतो.  मात्र गंभीर स्‍वरूपाच्‍या व कायदयानुसार तडजोडीस अपात्र असलेल्‍या फौजदारी प्रकरणे या लोकन्‍यायालयात समझोत्‍याने मिटविता येत नाहीत.  ढोबळ मानाने खालील प्रकारच्‍या प्रकरणांमध्‍ये समझोता करण्‍यात येतो. त्‍यामध्‍ये श्रम/ मजुरी संदर्भातील रोजगाराची, भविष्‍य निर्वाह निधी, व बोनससंबंधीत प्रकरणे सोडविण्‍यात येतात. तसेच वाहन अपघात झाल्‍यानंतर व्‍यक्‍तीस मृत्‍यु आल्‍यास त्‍याचे वारसांना नुकसान भरपाई किंवा अपघातातील बाधित व्‍यक्‍तीला अपंगत्‍व आल्‍यास त्‍यास नुकसान भरपाई मिळण्‍याकरीता जी प्रकरणे दाखल करण्‍यात येतात त्‍यासह रेल्‍वे व विज कंपनीच्‍या बाबतीत घडलेल्‍या अपघातांचा समावेश होतो. अशी प्रकरणे वर्षानुवर्षे न चालविता तातडीने दोन्‍ही पक्षाच्‍या चर्चेतुन तातडीने सोडविल्‍या जात असल्‍याने अपघात ग्रस्‍तांना वा मृताच्‍या वारसांना ही रक्‍कम ताबडतोब मिळते. 
          कौटूंबिक वादांच्‍याबाबतीत तर लोकन्‍यायालयाची संकल्‍पना अगदीच महत्‍वपुर्ण आहे. लग्‍नानंतर कोणत्‍याही कारणाने पतीपत्‍नीत विसंवाद निर्माण झाल्‍यास त्‍या उभयतांसह दोन परिवारांमध्‍ये वितुष्‍ट निर्माण होते.  कधीकधी हा वाद इतका पराकोटीला जातो की, त्‍यातून अनेकांचे संसार उध्‍वस्‍त होतात. ही परिस्‍थीती वर्णण करतांना
वं. महाराज म्‍हणतात...... ,
पुढे एकाशी एक न मिळेसर्प- मुंगसापरी सगळे, ׀׀
पंचायती नोटीसांचे सोहळे जीवन गारद यातचि ׀׀
          मात्र लोकन्‍यायालयाचे माध्‍यमातून खावटी, घटस्‍फोट, नांदवणूकीचा दावा तसेच हिंदु, मुस्‍लीम व ख्रिश्‍चन विवाहाच्‍या कायदयांशी संबंधित प्रकरणाचा ताबडतोब सोक्षमोक्ष लागतो.   त्‍यामुळे संबंधित प्रकरणातील पक्षकारांचे आयुष्‍य उध्‍वस्‍त होण्‍यापासून वाचते. 
          लोकन्‍यायालयाचा फायदा घेण्‍याची पध्‍दतीही अतिशय सोपी व सुलभ आहे, कोणत्‍याही पक्षकारास त्‍याच्‍या न्‍यायप्रविष्‍ठ प्रकरणात लोक अदालतीद्वारे निर्णय व्‍हावा असे वाटल्‍यास तो तसा अर्ज ज्‍या न्‍यायालयात प्रकरण प्रलंबित आहे, त्या न्‍यायालयात सादर करू शकतो, त्‍यानंतर असे प्रकरण हे लोकन्‍यायालयात पाठविण्‍या योग्‍य असल्‍यास संबंधित न्‍यायालय ते प्रकरण लोकन्‍यायासमक्ष पाठविते. त्‍यानंतर सदर प्रकरण लोकन्‍यायालयासमक्ष विचारात येवून दोन्‍ही पक्षकारांना त्‍यांचे म्‍हणणे मांडण्‍यासाठी वेळ दिला जातो. दोन्‍ही पक्षकारांचे म्‍हणणे ऐकून पंच समिती प्रकरणाचा सर्वंकष विचार करून न्‍याय तोडगा सुचविते, त्‍यानुसार प्रकरणात समझोता करण्‍याकरीता दोन्‍ही पक्षांचे प्रबोधन करण्‍यात येते. त्‍याठीकाणी समझोता झाल्‍यास त्‍या तरतुदींनुसार निकालपत्र तयार करण्‍यात येते व त्‍याची प्रत पक्षकारांना देण्‍यात येते, मात्र काही कारणास्‍तव प्रकरणात तडजोड न झाल्‍यास ते प्रकरण ते प्रलंबित होते त्‍या न्‍यायालयात परत पाठविण्‍यात येते व प्रकरणाची कायदयानुसारची कारवाई पुढे सुरू राहते.  लोकन्‍यायालयातील निर्णय हयांचे महत्‍व कोणत्‍याही अर्थाने कमकुवत नसते उलट या निकालांविरूध्‍द अपिल करण्‍याचीही सोय नाही.
          लोक न्‍यायालयाचे आयोजन हे दर महिन्‍याला तालुका किंवा जिल्‍हा न्‍यायालयात करण्‍यात येते. पक्षकारांच्‍या सोईकरीता लोकन्‍यायालयाचे आयोजन हे सुटीचे दिवशी करण्‍यात येते. पक्षकारांची मने जुळून येतात, परस्‍पर प्रेम वृध्‍दींगत होते, सुसंवाद निर्माण होतो, पैसा, वेळ व त्रासापासून बचाव होतो, कोर्ट फी म्‍हणून भरलेली रक्‍कम सुध्‍दा परत मिळते, म्‍हणून लोकन्‍यायालय हे लोकसुधारणेचे व न्‍यायालयीन यंत्रणेवरील ताण कमी करण्‍याचे सकारात्‍मक साधन आहे.
          लोकन्‍यायालयाची संकल्‍पना ही संत, समाजसुधारक व विचारवंतांच्‍या प्रेरणेने निर्माण झालेली आहे. ही योजना अधिकाधिक विकसीत झाली पाहीजे, अनेकांना त्‍याचा लाभ मिळाला पाहीजे, त्‍यामुळे हया प्रक्रीयेचा अधिकाधिक प्रचार होणे गरजेचा आहे.  सुशिक्षीत तरूण, शिक्षक बांधव, सामाजिक कार्यकर्ते व ज्‍या कोणाला राष्‍ट्राच्‍या प्रगतीकरीता सामाजिक सलोख्‍याकरीता काही करण्‍याची इच्‍छा आहे, त्‍या प्रत्‍येकानी लोकन्‍यायालयाच्‍या संकल्‍पनेचा प्रचार केला पाहीजे. 
जेथे नवनवी योजना-फुले, विकसोनि देती गोड फले׀
ग्रामराज्‍याचे स्‍वप्‍नही भले मूर्त होईल त्‍या गावी ׀׀
-         क्षितीज नागोराव अनोकार, अकोला
       9422177689

Tuesday, 30 December 2014

तुमने मारी एंट्री यार ! दीलमे बजी घंटी यार ! ........



तुमने मारी एंट्री यार ! दीलमे बजी घंटी यार ! ........
'' मुलं म्‍हणजे देवा घरची फुलं, ती पवित्र आहेत नि पवित्रच राहिली पाहिजेत; त्‍यांना गरीबी- श्रीमंतीच्‍या वादाची झळ, पंक्ष पक्षांचा वारा, अनितीची जळमटं लागू देता कामा नये! तरच इथ देवाच राज्‍य येईल ! देशाचा उज्‍वल भविष्‍यकाल त्‍यांच्‍या रूपानेच साकार होईल ''  ! : -  पूज्‍य साने गुरूजी
अतिशय मोजक्‍या शब्‍दात साने गुरूजींची मुलांची निरागसता, पवित्रता, चारित्‍य्राचे महत्‍व विषद केल आहे.  कोणत्‍याही धर्माचा, विचारधारेचा, परंपरेचा व्‍यक्‍ती गुरूजींचे कथनाचा विरोध करू शकत नाही.  प्रत्‍येक धर्म, पंथ, संप्रदाय, देश असो प्रत्‍येकाने बालपणात व्‍यक्‍तीला उत्‍तम संस्‍कार, उत्‍तम शिक्षण, ज्ञान देण्‍याची गरज अधोरेखीत केली आहे. मात्र आज अत्‍यंत धक्‍कादायक चित्र व वाईट परिस्‍थीती निर्माण होत असल्‍याचे पाहून जाणत्‍यांचे ह़दय पिळवटून निघत आहेत. 
            ज्‍यांचे दुधाचे ओठ अजून सुकले नाही, ओठांवर पुरती मिसरूडही फुटली नाही, अशी मुले दारू, गांजा, अफीम, तत्‍सम अनेक अंमली पदार्थांच्‍या  व्‍यसनांच्‍या आहारी गेली आहेत. कोवळया वयात आत्‍महत्‍या करण्‍या ईतपत टोकाची भुमीका घेणा-या बालकांच्‍या मृत्‍युने समाजमनाला जबरदस्‍त हादरा बसतो आहे.  इतकेच नव्‍हे तर गंभीर गुन्‍हयामध्‍ये कोवळया वयातील मुलांचा सहभाग वाढतांना दिसत आहे. लैंगीक अत्‍याचाराच्‍या गुन्‍हयामध्‍ये आरोपींचे सज्ञानतेचे वय कमी करावे लागेल की काय ? यावर चर्चा होवू लागली आहे. १५ ते १६ वर्षाची मुले विषय वासनेला शिकार होतांना दिसत आहेत, अशा परिस्‍थीतीत मुग गीळून गप्‍प बसून चालणार नाही, तर या घटनांच्‍या कारणांचा मागोवा घेणे व ती कारण समुळ नष्‍ट करण्‍यात जर आम्‍ही कसूर करणार असू तर आम्‍ही आमचे भविष्‍य बेचिराख केल्‍याशिवाय राहणार नाही. दुरचित्रवाणी, चित्रपट, हे कमीच होते की काय, नविन तंत्रज्ञानातून निर्माण झालेले मोबाईल, संगणकासारख्‍या वस्‍तुंनी मुलांच्या चारित्र्यावरच घाला घातला आहे.  त्‍यामुळे ही परिस्‍थीती वेळीच हाताळणे गरजेचे आहे. 
            आज रोजी समाजव्‍यवस्‍था वातावरण मोठया प्रमाणावर दुषीत झाले आहे, यात दुमत असणार नाही. त्‍यामुळे राष्ट्राचे भवितव्‍य ज्‍या बालकांच्‍या हाती आहे, ती बालके चारित्र्य संपन्‍न नसावी, असे कोण म्‍हणेल. वं. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्‍ये '' जीवन-शिक्षण '' या अध्‍यायात म्‍हणतात ......
गावचे सर्वात मुख्‍य पुत्र धन । त्‍याचे संरक्षावे चरित्रधन ।।
तेणे गावाचे वाढेल महिमान। चारित्र्यापरी उज्‍वल ।।
या ठीकाणी राष्‍ट्रसंतांनी गाव असा शब्‍द वापरला असला तरी गावावरूनी देशाची परिक्षा असे देखील राष्‍ट्रसंतांनी ग्रामगीतेत लिहून ठेवले आहे. त्‍यामुळे आम्‍हाला आमच्‍या राष्‍ट्राला समर्थ संपन्‍न आणी सक्षम बनवायचे असेल तर या बालकांचे बालपण व चारित्र प्राणपणाणे जपले पाहीजे.  २०१४ हे इंग्रजी वर्ष संपुन नविन वर्षाला प्रारंभ होतो आहे, प्रजासत्‍ताक दिन व स्‍नेह संम्‍मेलनाच्‍या निमीत्‍ताने शाळांमधून लहानग्‍यांच्‍या कार्यक्रमांची तयारी सुरू झाली आहे. शाळांची रंगरंगोटी झाली, कार्यक्रमाची रंगीत तालीम, साहित्‍याची जुळवाजुळव सुरू झाली. आमच्‍या लहानपणी शिवबाची तलवार, तानाजीचे शौर्यभगतसिंगाचे बलीदान, टिळकांचा बाणेदारपणा, राष्‍ट्रभक्‍ती व सर्वधर्म समभावावर आधारीत कार्यक्रम, विदयार्थ्‍यांच्‍या वैयक्‍तीक कला गुणांना वाव देण्‍याकरीता गायन, वादन, संगीताच्‍या कलांचे प्रदर्शन, शारीरीक कसरतीच्‍या कवायती, मल्‍लखांब, लेझीम, लाठीकाठी, अशा कार्यक्रमांचे नियोजन करतांना गुरूजन अगदी तल्‍लीन झालेले असत......  आई-वडील सुध्‍दा कुणाचा मुलगा भगतसिंगाची, शिवबा, तानाजीची भूमीका करणार असेल तर त्‍याच्‍यासाठी खेळण्‍यातील बंदूक, तलवार गोळा करण्‍यात व्‍यस्‍त असत, गांधीजीची भूमीका करण्‍यासाठी डोक्‍यावरच्‍या केसांचा त्‍याग करणारी मुले सुध्‍दा होती. गावातील नागरीक सुध्‍दा शाळेतल्‍या मुलांना रंगमंचावर साथ देण्‍याकरीता पेटी, तबला, टाळ, तानपुरा, बासरी, अश्या साहित्‍याची जुळवाजुळव व दुरूस्‍ती करण्‍यात दंग झालेले असे, पुर्ण गावावर नवचैतन्‍य निर्माण होत असे, अगदी कालच स्‍वातंत्र्य मिळाले की काय ? असे वातावरण निर्माण होत असे........ देशभक्‍तीपर चित्रपटातील गाणीप्रसंगसुध्‍दा साकारल्‍या जात होते. अश्‍लीलता व बिभत्‍सता.... मागमूसही नव्‍हता..........  
            आजचे स्‍नेहसंम्‍मेलन, गणतंत्र दिवस असेच का असू नये ? थोडे बालपण आठवावे, भूतकाळात थोडे डोकावावे याकरीता एका शाळेच्‍या वार्षिक स्‍नेहसंम्‍मेलनात गेलो.... माझ्या कल्पनांचे थोडयाच वेळात धिंडवडे निघाले.... स्‍टेजवर लहान लहान मुले व मुली ४ थी ५ वी तील असतील, '' तुने मारी एंट्री यार दिल मे बजी घंटी यार '' या गाण्‍यावर थिरकु लागली होती, स्‍टीरीओ कर्णकर्कश आवाजात केकाटत होता, स्‍टेज वरच्‍या हालचाली प्रौढ हीरोलाही लाजवणा-या होत्‍या, नृत्य शिकवणारा खानदानी नाच्‍या असावा, याची खात्री मुलांच्‍या हालचालीवरून पटत होती. सिटी विटी, आंखे वांखे ना यु मारो... या कडव्‍यावरील हालचालींनी कहर केला.  पालकांपैकी अनेक जण अस्‍वस्‍थ झाले होते, तर काही एंन्‍जॉय करीत होते. त्‍यानंतर पापा की परी हूँ मै.... या गाण्‍याने धुम केली, गाणे ऐकले पाहीले नसेल तर नक्‍की पहा... त्‍यानंतर खाली पिली खाली पिली टोकने का नै । तेरा पिछा करू तो रोकने का नै । एकेक नमुने दार गीत आणी त्‍यावर थीरकणारी कोवळी पावले... मन अस्‍वस्‍थ होतं होतं.... म्‍युझीक बजेगा लाउड तो राधा नाचेगीराम-लीला मधल गीत नगाडा संग ढोल बाजे ढोल बाजे ढयां ढयां ढम ढम ....  , नवराई माझी लाडाची लाडाची गं हे श्रीदेवीच्‍या चित्रपटातील गीत. त्‍यानंतर हे टेंशन च टेंशन कशालाटेम्‍परवारी हा मामला, फयुचर फटीचर है साला, प्रेझेंटमे जीले जरा ... हया गाण्‍यान खरच या देशाच, देशाच्‍या संस्कृतीच भविष्य फटीचर होण काही अशक्‍य नाही, हया विचारान भानावर आलो. बरीच गाणी इथ लिहीण्‍याची आवश्‍यकता ही नाही.
एके काळी तमाशाची लोक कला बहरू लागली होती तेंव्‍हा सुध्‍दा तरूणांवर त्‍याचा वाईट परीणाम जाणवू लागला होता. त्‍याची देखील वं. राष्‍ट्रसंतांनी ग्रामगीतेत दखल घेतली आहे,
जो तो लावणी मुखे उच्‍चारी । घरी दारी शेती मंदिरी ।
ज्‍याच्‍या त्‍याच्‍या तोंडी सारी ।गाणी विषयांची ।।
जो तो चांग भांग करी । मुद्रा सुरू झाली लाजरी ।
हावभाव शरीरावरी । नाचती घरी मुलेबाळे ।।
मुलींना मार्गी जायची चोरी । मुले छळती निलाजरी ।
येणे जाणे वाढवूनि घरी । नेल्‍या काढूनि कित्‍येक ।।    
या मुलांना त्‍या गाण्‍यातले हावभाव, शब्‍द कळत नाहीत, अस तुम्‍ही छातीवर हात ठेवून म्‍हणू शकाल का ? दुरचित्रवाणी व तत्‍सम उपकरणांनी मुले खुप समजदार व हुशार व्‍हायला लागली आहेत.  खर तर मुले अवेळीच प्रौढ व्‍हायला लागली आहेत, बालपण हरवत चाललं आहे, ही वस्‍तुस्‍थिती भयाण आहे. त्‍यात शाळांमधून संस्‍कारांचे शिक्षण मिळण्‍याऐवजी आगीत तेल ओतल्‍या जात असेल तर मग लागली वाट ! हा धोका राष्‍ट्रसंतांनी अगोदरच दाखवून ठेवलेला आहे, लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात, लहानपणी त्‍यांच्‍यावर जे विचार किंवा संस्‍कार पेरले जातात ते कायम टिकून राहतातबालपणी संस्‍कार देवून जिजाऊ मांसाहेबांनी शिवबांना घडवल ... अभिमन्‍युतर गर्भातून संस्‍कार प्राप्‍त करून आला होता. त्‍यामुळे आपल्‍या मुला बांळांना शिवबा, जोतीबा, सावित्री बनवणे शक्‍य नसेल तर किमान चारित्रय संपन्‍न व्‍यक्‍ती बनवण्‍याकरीता तुम्‍ही त्‍याला मदत करू शकता व त्‍याकरीता योग्‍य वातावरण निर्माण करणे, ही तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे.  वंदनिय राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज म्‍हणतात,
विशेषत: ऐसे मुलांचे वागणे । त्‍यांचे कार्यचि प्रतिध्‍वनी उठवणे ।
ते जे जे पाहती डोळयाने । ते चि आचरती उल्‍हासे ।।
म्‍हणूनि मुख्‍यांची जबाबदारी । ते जे करतील ग्रामाभीतरी ।
मुले आचरतील घरी-दारी, मात्‍यापित्‍यासी वळवोनि ।।        
            म्‍हणून आपण आपली मुले- लेकरे मोठया विश्‍वासाने व जबाबदारीने शिक्षकांकडे, शाळेकडे सोपवत असतो, त्‍यांनी सुध्‍दा आपली जबाबदारी ओळखून मुलांच्‍या चारित्र संवर्धनाचे कार्य मोठया हिमतीने केले पाहीजे. कारण आजचे विदयार्थी आई-वडींलांपेक्षा शाळा व गुरूजनांच्‍या ताब्‍यात जास्‍त असतात.  म्‍हणून वं. महाराज म्‍हणतात .....
ओळखोनि जबाबदारी । शिक्षक जिव्‍हाळयाने कामकरी ।
तरीच गाव होय स्‍वर्गपुरी । न पडे जरूरी कोणाची ।।
मुलांना शिक्षकांच्‍या ताब्‍यात दिले, त्‍यांना शाळेचे गणवेश खरेदी करून दिले, पुस्‍तके व वहयांचा खर्च केला, शिक्षकांना शिकवणीचे पैसे दिले, मुलांना काय हवे नको ते पाहीले म्‍हणजे पालकांची जबाबदारी संपत नाही, केवळ शिक्षण मिळणेच महत्‍वाचे नाही, तर राष्‍ट्राच्‍या उज्‍वल भवितव्‍यासाठी आदर्श नागरीक बनवण्‍याच्‍या प्रक्रियेत पालकांना सक्रिय सहभाग घ्‍यावा लागेल. शाळांमधून विदयार्थ्‍यांना शिक्षणासोबतच सुसंस्‍कार मिळतात की नाही, याकडे प्रामुख्‍याने लक्ष दयावे लागेल.   जर त्‍याच्‍या शाळेत त्‍याच्‍या चारीत्रयावर ओरखडे ओढणारा प्रकार घडत असेल, तर मात्र जाऊ द्या.... एवढयाने काही फरक पडत नाही, अशी भूमिका न घेता.....
कदाचित केले एखादयाने । तेही सहन करू नये कोणे ।
लावावी उधळून समंजसपणे । वाईट रिती ।।
या राष्‍ट्रसंतांच्‍या वचनाप्रमाणे तातडीने अशा प्रकारांना हरकत नोंदवावी. तसेच असे प्रकार पुन्‍हा घडणार नाहीत, याकरीता योग्‍य ती पावले उचलावी.
शाळा म्‍हणजे विदया दानाच्‍या पवित्र वास्‍तु आहेत. त्‍यामधुन राष्‍ट्राचे भवितव्‍य घडत असते, म्‍हणून या लेखाच्‍या अनुषंगाने शिक्षण विभागाशी संबधित सर्व जबाबदार अधिकारी, मुख्‍याध्यापक, शिक्षक, व पालकांनी गंभीरपणे विचार करून येणा-या गणतंत्र दिनाच्‍या निमीत्‍ताने किंवा स्‍नेहसंम्‍मेलनाच्‍या निमीत्‍ताने आयोजित करण्‍यात येणा-या कार्यक्रमांमध्‍ये दर्जेदार कार्यक्रमाचा अंतर्भाव असेल  अश्‍लील किंवा बिभत्‍स चित्रपटगीतांचा समावेश या कार्यक्रमांमध्‍ये नसावा याची दक्षता घ्‍यावी.
क्षितीज नागोराव अनोकार
                                                                                              अकोला