तुमने मारी एंट्री यार ! दीलमे बजी घंटी यार ! ........
'' मुलं म्हणजे देवा घरची फुलं, ती पवित्र आहेत नि पवित्रच राहिली पाहिजेत; त्यांना गरीबी- श्रीमंतीच्या वादाची झळ, पंक्ष पक्षांचा वारा, अनितीची जळमटं
लागू देता कामा नये! तरच इथ देवाच राज्य येईल ! देशाचा उज्वल भविष्यकाल त्यांच्या
रूपानेच साकार होईल '' !
: - पूज्य साने गुरूजी
अतिशय मोजक्या शब्दात साने गुरूजींची मुलांची निरागसता, पवित्रता, चारित्य्राचे महत्व विषद केल आहे.
कोणत्याही धर्माचा, विचारधारेचा, परंपरेचा व्यक्ती गुरूजींचे कथनाचा विरोध
करू शकत नाही. प्रत्येक धर्म, पंथ, संप्रदाय, देश असो प्रत्येकाने बालपणात व्यक्तीला उत्तम संस्कार, उत्तम शिक्षण,
ज्ञान देण्याची गरज अधोरेखीत केली आहे. मात्र आज अत्यंत धक्कादायक चित्र व वाईट परिस्थीती
निर्माण होत असल्याचे पाहून जाणत्यांचे ह़दय पिळवटून निघत आहेत.
ज्यांचे दुधाचे ओठ अजून सुकले नाही, ओठांवर पुरती मिसरूडही फुटली नाही, अशी मुले दारू, गांजा, अफीम, तत्सम अनेक अंमली पदार्थांच्या व्यसनांच्या आहारी गेली
आहेत. कोवळया वयात आत्महत्या करण्या ईतपत टोकाची भुमीका घेणा-या बालकांच्या मृत्युने समाजमनाला
जबरदस्त हादरा बसतो आहे. इतकेच नव्हे तर
गंभीर गुन्हयामध्ये कोवळया वयातील मुलांचा सहभाग वाढतांना दिसत आहे. लैंगीक अत्याचाराच्या गुन्हयामध्ये
आरोपींचे सज्ञानतेचे वय कमी करावे लागेल की काय ? यावर चर्चा होवू लागली आहे. १५ ते १६ वर्षाची मुले विषय वासनेला शिकार होतांना दिसत आहेत, अशा परिस्थीतीत
मुग गीळून गप्प बसून चालणार नाही, तर या घटनांच्या कारणांचा मागोवा घेणे व ती कारण समुळ नष्ट
करण्यात जर आम्ही कसूर करणार असू तर आम्ही आमचे भविष्य बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही. दुरचित्रवाणी, चित्रपट, हे कमीच होते की काय, नविन तंत्रज्ञानातून निर्माण झालेले मोबाईल, संगणकासारख्या वस्तुंनी मुलांच्या चारित्र्यावरच घाला घातला आहे. त्यामुळे ही परिस्थीती वेळीच हाताळणे गरजेचे आहे.
आज रोजी समाजव्यवस्था व वातावरण मोठया प्रमाणावर दुषीत झाले आहे, यात दुमत असणार नाही. त्यामुळे राष्ट्राचे भवितव्य ज्या बालकांच्या हाती आहे,
ती बालके चारित्र्य संपन्न नसावी, असे कोण म्हणेल. वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये '' जीवन-शिक्षण '' या अध्यायात म्हणतात ......
गावचे सर्वात मुख्य पुत्र धन । त्याचे संरक्षावे चरित्रधन ।।
तेणे गावाचे वाढेल महिमान। चारित्र्यापरी उज्वल ।।
या ठीकाणी राष्ट्रसंतांनी गाव असा शब्द वापरला असला तरी गावावरूनी देशाची परिक्षा असे देखील राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत लिहून ठेवले आहे. त्यामुळे
आम्हाला आमच्या राष्ट्राला समर्थ संपन्न आणी सक्षम बनवायचे असेल तर या बालकांचे बालपण व चारित्र
प्राणपणाणे जपले पाहीजे.
२०१४ हे इंग्रजी वर्ष
संपुन नविन वर्षाला प्रारंभ
होतो आहे, प्रजासत्ताक दिन व स्नेह संम्मेलनाच्या
निमीत्ताने शाळांमधून लहानग्यांच्या
कार्यक्रमांची तयारी सुरू झाली आहे. शाळांची रंगरंगोटी झाली, कार्यक्रमाची
रंगीत तालीम, साहित्याची जुळवाजुळव सुरू झाली. आमच्या
लहानपणी शिवबाची तलवार,
तानाजीचे शौर्य, भगतसिंगाचे बलीदान, टिळकांचा
बाणेदारपणा, राष्ट्रभक्ती व सर्वधर्म समभावावर आधारीत
कार्यक्रम, विदयार्थ्यांच्या वैयक्तीक कला
गुणांना वाव देण्याकरीता गायन, वादन, संगीताच्या कलांचे प्रदर्शन, शारीरीक कसरतीच्या कवायती, मल्लखांब,
लेझीम, लाठीकाठी, अशा कार्यक्रमांचे नियोजन करतांना गुरूजन अगदी तल्लीन
झालेले असत...... आई-वडील सुध्दा
कुणाचा मुलगा भगतसिंगाची, शिवबा, तानाजीची भूमीका करणार असेल तर त्याच्यासाठी खेळण्यातील बंदूक, तलवार गोळा करण्यात व्यस्त असत, गांधीजीची भूमीका करण्यासाठी डोक्यावरच्या
केसांचा त्याग करणारी मुले सुध्दा होती. गावातील नागरीक सुध्दा शाळेतल्या मुलांना रंगमंचावर साथ
देण्याकरीता पेटी, तबला, टाळ, तानपुरा, बासरी, अश्या साहित्याची जुळवाजुळव व दुरूस्ती
करण्यात दंग झालेले असे,
पुर्ण गावावर नवचैतन्य निर्माण होत असे, अगदी कालच स्वातंत्र्य मिळाले की काय ? असे वातावरण
निर्माण होत असे........
देशभक्तीपर चित्रपटातील गाणी, प्रसंगसुध्दा
साकारल्या जात होते. अश्लीलता
व बिभत्सता.... मागमूसही नव्हता..........
आजचे स्नेहसंम्मेलन, गणतंत्र दिवस असेच का
असू नये ?
थोडे बालपण आठवावे, भूतकाळात
थोडे डोकावावे याकरीता
एका शाळेच्या वार्षिक स्नेहसंम्मेलनात गेलो.... माझ्या कल्पनांचे थोडयाच वेळात धिंडवडे निघाले.... स्टेजवर
लहान लहान मुले व मुली ४ थी ५ वी तील असतील, '' तुने मारी एंट्री यार दिल मे बजी घंटी यार '' या गाण्यावर थिरकु लागली होती, स्टीरीओ कर्णकर्कश आवाजात केकाटत होता, स्टेज वरच्या हालचाली प्रौढ हीरोलाही
लाजवणा-या होत्या, नृत्य शिकवणारा खानदानी नाच्या असावा, याची खात्री मुलांच्या
हालचालीवरून पटत होती. सिटी विटी, आंखे वांखे ना यु
मारो... या कडव्यावरील
हालचालींनी कहर केला. पालकांपैकी अनेक
जण अस्वस्थ झाले
होते, तर काही एंन्जॉय करीत होते. त्यानंतर
पापा की परी हूँ मै.... या
गाण्याने धुम केली, गाणे ऐकले पाहीले नसेल तर नक्की पहा...
त्यानंतर खाली पिली खाली
पिली टोकने का नै । तेरा पिछा करू तो रोकने का नै । एकेक नमुने दार गीत आणी त्यावर थीरकणारी कोवळी पावले...
मन अस्वस्थ होतं होतं.... म्युझीक बजेगा लाउड तो राधा नाचेगी, राम-लीला
मधल गीत नगाडा संग ढोल बाजे ढोल बाजे ढयां ढयां ढम ढम .... , नवराई माझी लाडाची
लाडाची गं हे श्रीदेवीच्या चित्रपटातील गीत. त्यानंतर हे टेंशन च टेंशन कशाला, टेम्परवारी हा मामला, फयुचर फटीचर है साला, प्रेझेंटमे जीले
जरा ... हया गाण्यान खरच या देशाच, देशाच्या संस्कृतीच भविष्य फटीचर होण काही अशक्य नाही, हया विचारान भानावर आलो. बरीच गाणी इथ लिहीण्याची आवश्यकता ही नाही.
एके काळी तमाशाची लोक कला बहरू लागली होती तेंव्हा सुध्दा तरूणांवर त्याचा वाईट परीणाम जाणवू
लागला होता. त्याची देखील वं. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत दखल घेतली आहे,
जो तो लावणी मुखे उच्चारी । घरी दारी शेती मंदिरी ।
ज्याच्या त्याच्या तोंडी सारी ।गाणी विषयांची ।।
जो तो चांग भांग करी । मुद्रा सुरू झाली लाजरी ।
हावभाव शरीरावरी । नाचती घरी मुलेबाळे ।।
मुलींना मार्गी जायची चोरी । मुले छळती निलाजरी ।
येणे जाणे वाढवूनि घरी । नेल्या काढूनि कित्येक ।।
या मुलांना त्या गाण्यातले हावभाव, शब्द कळत
नाहीत, अस तुम्ही छातीवर हात ठेवून म्हणू शकाल
का ? दुरचित्रवाणी व तत्सम उपकरणांनी मुले खुप समजदार व हुशार व्हायला लागली आहेत. खर तर मुले अवेळीच प्रौढ व्हायला लागली आहेत, बालपण हरवत
चाललं आहे, ही वस्तुस्थिती भयाण आहे. त्यात शाळांमधून संस्कारांचे
शिक्षण मिळण्याऐवजी आगीत तेल ओतल्या जात असेल तर मग लागली वाट ! हा धोका राष्ट्रसंतांनी
अगोदरच दाखवून ठेवलेला
आहे, लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात, लहानपणी त्यांच्यावर जे विचार किंवा संस्कार पेरले जातात ते कायम टिकून राहतात, बालपणी संस्कार देवून जिजाऊ मांसाहेबांनी
शिवबांना घडवल ... अभिमन्युतर गर्भातून संस्कार प्राप्त करून आला होता. त्यामुळे आपल्या मुला
बांळांना शिवबा, जोतीबा, सावित्री बनवणे शक्य नसेल तर किमान चारित्रय संपन्न व्यक्ती बनवण्याकरीता तुम्ही त्याला मदत करू शकता व त्याकरीता
योग्य वातावरण निर्माण करणे, ही तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे.
वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,
विशेषत: ऐसे मुलांचे वागणे । त्यांचे कार्यचि प्रतिध्वनी उठवणे ।
ते जे जे पाहती डोळयाने । ते चि आचरती उल्हासे ।।
म्हणूनि मुख्यांची जबाबदारी । ते जे करतील ग्रामाभीतरी ।
मुले आचरतील घरी-दारी, मात्यापित्यासी वळवोनि ।।
म्हणून आपण आपली
मुले- लेकरे मोठया विश्वासाने व जबाबदारीने शिक्षकांकडे, शाळेकडे सोपवत असतो,
त्यांनी सुध्दा आपली जबाबदारी ओळखून मुलांच्या चारित्र
संवर्धनाचे कार्य मोठया
हिमतीने केले पाहीजे. कारण आजचे विदयार्थी आई-वडींलांपेक्षा शाळा व गुरूजनांच्या ताब्यात जास्त असतात.
म्हणून वं. महाराज म्हणतात .....
ओळखोनि जबाबदारी । शिक्षक जिव्हाळयाने कामकरी ।
तरीच गाव होय स्वर्गपुरी । न पडे जरूरी कोणाची ।।
मुलांना शिक्षकांच्या ताब्यात दिले, त्यांना शाळेचे
गणवेश खरेदी करून दिले, पुस्तके व वहयांचा खर्च केला, शिक्षकांना शिकवणीचे पैसे दिले, मुलांना काय हवे नको ते पाहीले म्हणजे पालकांची जबाबदारी संपत नाही, केवळ
शिक्षण मिळणेच महत्वाचे नाही, तर राष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी
आदर्श नागरीक बनवण्याच्या प्रक्रियेत पालकांना सक्रिय सहभाग घ्यावा लागेल. शाळांमधून विदयार्थ्यांना
शिक्षणासोबतच सुसंस्कार मिळतात
की नाही, याकडे प्रामुख्याने लक्ष दयावे लागेल.
जर त्याच्या शाळेत त्याच्या चारीत्रयावर ओरखडे ओढणारा प्रकार घडत असेल,
तर मात्र जाऊ द्या.... एवढयाने काही फरक पडत नाही, अशी भूमिका न घेता.....
कदाचित केले एखादयाने ।
तेही सहन करू नये कोणे ।
लावावी उधळून समंजसपणे ।
वाईट रिती ।।
या राष्ट्रसंतांच्या वचनाप्रमाणे तातडीने अशा प्रकारांना हरकत नोंदवावी. तसेच असे प्रकार पुन्हा घडणार
नाहीत, याकरीता योग्य ती पावले उचलावी.
शाळा म्हणजे विदया दानाच्या पवित्र वास्तु आहेत. त्यामधुन राष्ट्राचे भवितव्य
घडत असते, म्हणून या लेखाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाशी संबधित
सर्व जबाबदार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक,
व पालकांनी गंभीरपणे विचार करून येणा-या गणतंत्र दिनाच्या निमीत्ताने किंवा स्नेहसंम्मेलनाच्या
निमीत्ताने आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमांमध्ये दर्जेदार कार्यक्रमाचा अंतर्भाव असेल अश्लील किंवा बिभत्स चित्रपटगीतांचा समावेश या कार्यक्रमांमध्ये नसावा याची दक्षता घ्यावी.
क्षितीज नागोराव
अनोकार
अकोला